Dhananjay Munde
Dhananjay MundeDhananjay Munde

Dhananjay Munde : कोकाटे प्रकरणानंतर घडामोडींना गती; धनंजय मुंडेंनी घेतली भाजपच्या 'या' नेत्यांची भेट

राज्यातील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत.
Published on

राज्यातील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या असून, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेते अमित शहांची भेट घेतली आहे. नुकतीच त्यांनी पोस्ट टाकत माहिती दिली आहे.

माणिकराव कोकाटे हे शासकीय सदनिका वाटपातील गैरप्रकारामुळे अडचणीत आले आहेत. १९९५ साली झालेल्या या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही प्रथम वर्ग न्यायालयाने हाच निर्णय दिला होता. या निकालामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळवण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच मुंडे दिल्लीला रवाना झाले असून, त्यांनी संसदेत भाजपच्या काही नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड अटकेत गेल्यानंतर, त्याच्याशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावे लागले होते.

मंत्रीपद गेल्यानंतर पक्षाकडून धनंजय मुंडेंना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ते पुन्हा सक्रिय होत जबाबदारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रायगड येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उघडपणे भूमिका मागितली होती. तटकरे यांच्या नागरी सत्कारावेळी बोलताना त्यांनी, “मला रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या,” अशी मागणी केली होती. मात्र, तरीही पक्षाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता धनंजय मुंडे स्वतः पुढाकार घेत राजकीय हालचाली वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे.

थोडक्यात

  1. राज्यातील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर अटकेची शक्यता निर्माण झाली.

  2. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेते अमित शहांची भेट घेतली

  3. राज्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com