Dhananjay Munde : 'अजितदादांना पाया पडून सांगत होतो पण...' पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीवरून एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात बोलताना ते म्हणाले, "मी शपथविधीपूर्वी दादांना जाऊ नका असे सांगितले होते. शपथविधी हा षडयंत्र आहे, पण दादांनी माझे ऐकले नाही."धनंजय मुंडे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेचा शपथविधी पार पडला होता. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या घटनेवरून धनंजय मुंडे म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले, काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरु झालं, असे त्यांनी म्हटले आहे.
मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आलीय. बीडच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडलाय. आम्ही शिव शाहू फुलेंच्या विचाराचे आहोत का असा प्रश्न विचारला जातोय. पण एक सांगेन की आपला एकमेव पक्ष आहे जो शिव शाहू फुलेंच्या विचाराने चालतो.
बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी केलं त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. त्या 5-8 गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला म्हणत आहेत कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे. पण, एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जातंय. आम्ही हात जोडून विनंती केली. माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यामागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायचीच ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही. आपल्याला नव संकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यावर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.