Ravindra Dhangekar : गुन्हेगारीबाबत भाष्य करताना धंगेकर यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
थोडक्यात
धंगेकर यांचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप
पुणेकरांसाठी वेळ पडली तर स्वतःचे राजकीय नुकसान करायला तयार
मी फक्त पुण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना प्रश्न विचारले
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी त्यांच्यासोबत युतीत असलेल्या भाजपच्या नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत भाष्य करताना त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्याची तक्रार धंगेकर यांचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. रविवारी (12 ऑक्टोबर) पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा, महायुतीत पंगा नको असे धंगेकर यांना सांगण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पण तरीही रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठे विधान केले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुणेकरांसाठी वेळ पडली तर स्वतःचे राजकीय नुकसान करायला तयार आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझे राजकीय नुकसान होत आहे. मात्र, त्याची किंमत मोजायला मी तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांनाही गुन्हेगारी नको असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, भाजपचे नेते टीका करतात त्यांनी स्वतःला आरशात पाहावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. रविवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यावरही त्यांनी भाष्य केले. “एकनाथ शिंदे बोलले ती माझीच भाषा होती. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त आणि भयमुक्त केले पाहिजे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी जी चर्चा झाली.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
“मी कोणावरही टीका केली नाही, मी फक्त पुण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना प्रश्न विचारले. मी टीका कालही करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करत राहणार आहे. माझे आजही म्हणणे तेच आहे. कोणावर मी टीका करत आहे, त्यापेक्षा पुणे हे भयमुक्त झाले पाहिजे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पबवर टीका केली तेव्हा ते माझ्याविरोधात उभे राहिले होते. पोर्शे कार अपघात प्रकरणात बोलल्यावर ते लोक माझ्याविरोधात गेले, गुन्हेगारही माझ्याविरोधात आहेत,” असे स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी पुढे दिले. दरम्यान, रविवारी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “रवींद्र धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, त्यांना मी सांगितलं आहे महायुतीत दंगा नको. गुन्हेगारांना क्षमा नाही, कोणीही असूद्यात त्याला पाठीशी घातले जाणार नाही,” असे आश्वासन दिले होते.