Ravindra Dhangekar : “मी व्यक्तींवर नव्हे...” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ प्रकरणावर स्पष्ट पवित्रा
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात झालेल्या चर्चेत आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांचे नाव न घेता गुन्हेगारीला जबाबदार असणाऱ्या प्रवृत्तींवरच टीका केली असल्याचे स्पष्ट केले. आज त्यांनी लोकशाही मराठी सोबत खास संवाद साधला. ते म्हणाले “मुरलीधर मोहोळ यांच्यावर मी बोलत नाही, त्यांच्या विकृतीवर मी बोललोय. पुण्यात गुन्हेगारी वाढवणाऱ्यांवरच बोललं पाहिजे. महावीर जैन मंदिर अडचणीत आणणाऱ्यांवरही टीका झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
धंगेकर यांनी स्पष्ट केले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रति दाखवलेल्या विश्वासाला ते पात्र राहतील. “शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी कधीच पक्षाला अडचणीत आणणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंकडून काही संदेश आहे का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
“पुणेकरांच्या हक्कांसाठी मी कायम लढणार आहे. पुण्याला कोणी बदनाम करत असेल, पुणे धोक्यात येत असेल तर त्याला मी विरोध करणार,” असे ते ठामपणे म्हणाले. “कोणत्याही व्यक्तीवर नव्हे, तर विकृतीवर बोलण्याचा शिंदे साहेबांचा आदेश मी पाळत आहे,” अशीही त्यांची भूमिका आहे. लोकशाहीत सरकारला धारेवर धरल्याशिवाय प्रश्न सुटत नसल्याचा दावा करत धंगेकर म्हणाले, “जर विचारले की तुम्ही सर्वजण एकत्र बसून सामाजिक प्रश्न का सोडवत नाहीत, तर सर्व गुंडांना एकत्र बसवून, ‘गुन्हे करू नका’ अशी विनंती केली तर प्रश्न सुटणार आहे का?” अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजकीय टीका-टिप्पण्या सहन करतानाही अन्यायाविरुद्ध आवाज कायम बुलंद राहील, असे ते म्हणाले. “राजकीय कितीही रत्नमाला सोसाव्या लागल्या तरी मी सोसेन. पण अन्यायाविरुद्ध कायम आवाज उठवत राहणार,” अशी त्यांची ठाम भूमिका.
शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात झालेल्या मागील भेटीचा उल्लेख करत धंगेकर म्हणाले, “पुणे सुरक्षित राहिले पाहिजे, आया-बहिणींचा कुंकू सुरक्षित राहिले पाहिजे; त्यासाठी काम करा, असे शिंदे साहेबांनी सांगितले होते. आणि त्याच आदेशाने मी पुढे जात आहे.”

