CM Fadnavis : धारावी पुनवर्सनाबाबत मुख्यमंत्र्यांनी केल मोठं वक्तव्य, म्हणाले "धारावी कोणा...."
CM Fadnavis : धारावीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. धारावीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने राहता येईल असे घर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पात्र असो वा अपात्र, कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले..
गेल्या अनेक वर्षांत केवळ चर्चा होत राहिल्या, पण आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. उंच आणि अडचणीच्या इमारती नकोत, असे ठरवून सरकारने वेगळ्या पद्धतीचा पुनर्विकास आराखडा तयार केला आहे. पात्र नागरिकांना सुमारे ३५० चौरस फूटाचे घर मिळणार असून परिसरात चांगल्या सुविधा, मोकळी जागा आणि देखभाल खर्चाचा बोजा नसलेली व्यवस्था असेल.
धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर मेहनती लोकांची वसाहत आहे, असे सांगत फडणवीस यांनी येथील उद्योग, हस्तकला, चामडे, मातीची भांडी आणि अन्नप्रक्रिया व्यवसायाचे कौतुक केले. या सगळ्या गोष्टी जपूनच विकास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
पुनर्विकासात बागा, मैदाने उभारली जातील आणि काही वर्षे राज्य करातून सूट देण्यात येईल. धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीच्या घशात जाणार नाही, सरकार आणि संबंधित संस्थांचा पूर्ण ताबा राहील, असा विश्वासही त्यांनी दिला. शेवटी त्यांनी सांगितले की, धारावीकरांच्या भविष्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मतदानानंतर कामाला वेग येईल आणि प्रत्येकाला स्वतःचे घर मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही

