Navi Mumbai : लोकशाही मराठीचा थेट इम्पॅक्ट! नटराज बार प्रकरणाची डीजीपींकडून चौकशी
कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये घडलेल्या एका वादग्रस्त घटनेची बातमी लोकशाहीने उघडकीस आणल्यानंतर राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल थेट राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी घेतली असून, त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अचानक आणि गोपनीय भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान संबंधित घटनेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे समजते.
लोकशाहीने प्रसारित केलेल्या बातमीनुसार, अनिल मांडोळे नावाच्या पोलीस हवालदाराने कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये खुलेआम पैसे उडवत नृत्य केल्याचा प्रकार उघड झाला होता. या घटनेचा व्हिडिओ आणि संबंधित माहिती समोर आल्यानंतर पोलीस शिस्त, नैतिकता आणि आचारसंहितेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याने ही बाब अधिकच संवेदनशील ठरली आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बंदद्वार बैठक घेतली. या बैठकीत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी, त्याच्याविरोधात यापूर्वी काही तक्रारी होत्या का, तसेच घटनेच्या वेळी तो सेवेत होता की रजेवर होता, यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशी अहवाल डीजीपींकडे सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणानंतर नवी मुंबई पोलीस दलात अस्वस्थता पसरली असून, वरिष्ठ पातळीवरून कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कोणत्याही प्रकारावर कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा यापूर्वीही राज्य पोलीस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात निलंबन, विभागीय चौकशी किंवा शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, लोकशाहीने ही बाब उघडकीस आणल्यानंतर नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “कायदा रक्षकच जर कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?” असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. आता या प्रकरणावर राज्य पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
