Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेवर सभागृहात चर्चा; 2100 रुपयांबाबत एकनाथ शिंदेंची महत्वाची घोषणा
राज्यातील लोकप्रिय ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवर आज विधानसभेत तुफान चर्चा झाली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु केवायसी प्रक्रियेत अडचणी, काही ठिकाणी बोगस फॉर्म भरल्याचे आरोप आणि वाढीव 2100 रुपयांचा प्रश्न यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी आरोप केला की आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना टार्गेट देऊन मोठ्या प्रमाणात फॉर्म भरायला लावण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी चुकीची नोंदणी झाली असून योजनेत मोठा गोंधळ झाल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली. जनतेच्या पैशांचा योग्य हिशोब द्यावा लागेल, असा त्यांचा आग्रह होता.
या आरोपांवर महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी पोर्टल आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून नोंदणीची सुविधा दिली असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांनी अनाठायी वाद निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना थेट लक्ष्य केले. “लाडकी बहीण योजनेला विरोध केल्यामुळेच तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. अजून विरोध करत राहिलात, तर भविष्यात लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील,” अशा शब्दांत त्यांनी पटोलेंना टोला लगावला.
वाढीव 2100 रुपये कधी मिळणार, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होताच एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, “योग्य वेळ आली की महिलांना 2100 रुपयांचाही लाभ दिला जाईल.” मात्र त्यासाठी विशिष्ट तारीख जाहीर करण्यात आली नाही. एकूणच, लाडकी बहीण योजनेबाबतचे तांत्रिक प्रश्न, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वाढीव आर्थिक मदतीची चर्चा यामुळे सभागृहात वातावरण तापले. तरीही सरकारने योग्य वेळेत महिलांना जास्त मदत देण्याचे संकेत दिल्याने लाभार्थी महिलांकडून आता त्या घोषणेची प्रतीक्षा सुरू झाली आहे.
