अजित पवारांच्या भाषणावेळी तरुणांचा गोंधळ, भंडाऱ्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या भाषणावेळी तरुणांचा गोंधळ, भंडाऱ्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
Published by  :
shweta walge

भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. या तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या तरुणांना तातडीने ताब्यात घेतलं. पण तरीही काही काळासाठी गर्दीमधील वातावरण तणावाचं बघायला मिळालं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“जनतेच्या घरापर्यंत, दारापर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठीच महायुती सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु केला. काही दिव्यांग होते, काही महिला बचत गट उत्तम पद्धतीने चालवतात, आपण काहींना ट्रॅक्टर दिलेलं आहे. अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. शेवटी सरकार काम करत असताना तो कार्यक्रम लोकाभिमुख झाला पाहिजे. त्या कामातून प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की, हे सरकार माझा विचार करतंय. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करतंय”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

“अनेक महत्त्वाचे निर्णय या सव्वा वर्षाच्या काळात घेतले आहेत, त्यातून माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना सुरु केली. शेतकऱ्यासाठी कोट्यवधी रुपये आपण खर्च करतो. शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा काढता येतो. याचा लाभ राज्यातल्या अक्षरश: लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. तो झालादेखील आहे. या योजनेतून शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी आणि आत्मनिर्भर राहण्यासाठी झालाय”, असं अजित पवार म्हणाले.

“प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आतापर्यंत 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दर आठवड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेत असतात. या बैठकीत आम्ही सर्वजण असतो. वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री या बैठकीत असतात. त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतात ते सांगण्याचा प्रयत्न ते करतात. आपण 1 हजार 954 कोटी रुपयांचं वाटप महाष्ट्रातील विविध भागात करतोय. त्यातील 965 कोटी रुपयांची मदत याआधीच शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम चालू आहे”, असंही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

भाषणादरम्यानच गोंधळ उडाल्याने अजित पवारांना आपलं भाषण काहीवेळासाठी थांबवावं लागलं. पोलिसांनी आंदोलकर्त्याला ताब्यात घेतलं असून त्याला सभा स्थळापासून बाहेर नेण्यात आलं आहे. त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. यानंतर अजित पवारांनी आपलं भाषण सुरु ठेवलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com