Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ 'या' शहरांमध्ये बंदची हाक

काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामधील तीन जण डोंबिवलीतील होते.
Published by :
Rashmi Mane

काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामधील तीन जण डोंबिवलीतील होते. संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने या तिघांवर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, भाजप कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह हजारो डोंबिवलीकरदेखील उपस्थित होते. तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच डोंबिवलीकरांमध्ये संतापची लाट उसळलेली पाहायला मिळाली. अंत्यसंस्कारादरम्यान बागशाला मैदान, तसेच स्मशानभूमी बाहेर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. डोंबिवली शहरात जागोजागी हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने या तिघांना श्रद्धांजली देण्यासाठी होर्डिंग लावण्यात आले. या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज, गुरुवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला असून शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून आज शाळा बंद ठेवल्यामुळे आजच्या परीक्षा शनिवारी घेण्यात येणार आहेत.

तसेच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने अमरावती शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे आज सकाळी दहा वाजता आंदोलन पार पडले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com