Donald Trump : किम-पुतीन भेटीनंतर ट्रम्प संतप्त; अमेरिकेविरोधात कट रचल्याचा आरोप
चीनच्या विजय दिनानिमित्त बीजिंगच्या थियानमेन चौकात पार पडलेल्या भव्य सैन्य परेडनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या परेडमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन एकत्र दिसल्याने अमेरिकेत राजकीय खळबळ माजली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आरोप केला की चीन-रशिया-उत्तर कोरिया मिळून अमेरिकेविरोधात कट रचत आहेत. या आरोपावर रशियाकडून तातडीची प्रतिक्रिया आली असून, ट्रम्प यांचे वक्तव्य म्हणजे “फक्त विनोद” असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
ट्रम्प यांचा थेट आरोप
परेडमध्ये आधुनिक क्षेपणास्त्रं, टँक, युद्धसज्ज तुकड्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात पुतिन आणि किम जोंग उन यांच्या उपस्थितीमुळे अमेरिकेच्या संशयांना अधिक खतपाणी मिळालं. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, “शी जिनपिंग, पुतिन आणि किम जोंग उन हे मिळून अमेरिकेविरोधात कट रचत आहेत. चीनने लक्षात ठेवायला हवे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने त्यांना वाचवण्यासाठी मोठं बलिदान दिलं होतं. अनेक अमेरिकी सैनिकांनी प्राण दिले. त्याची कदर चीनने करायला हवी.”
रशियाची झटकन प्रतिक्रिया
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर रशियाच्या परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पुतिन, शी जिनपिंग आणि किम जोंग उन यांच्यात अमेरिकेविरोधात कट रचण्याचा कोणताही विचार नाही. ट्रम्प यांनी केलेला आरोप हा केवळ जोक आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांना असं विधान धक्का पोहोचवतं.”
परेडच्या व्यासपीठावरून शी जिनपिंग यांनी अमेरिकेचं नाव न घेता जगाला संदेश दिला. “आता जगाला शांतता आणि युद्ध यापैकी एक पर्याय निवडावा लागेल,” असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चीन-अमेरिका तणाव आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तथापि, संभाव्य धोका नाकारताना ट्रम्प म्हणाले, “मी अजिबात चिंतित नाही. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सेना आहे. चीन, रशिया आणि उत्तर कोरिया मिळूनसुद्धा आमच्याविरुद्ध लष्करी कारवाई करू शकत नाहीत.”
चीनच्या भव्य सैन्य परेडमध्ये रशिया आणि उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती ही अमेरिका आणि पश्चिम देशांसाठी राजनैतिक आव्हान मानली जात आहे. ट्रम्प यांनी जरी कटाचा आरोप केला असला तरी रशियाने तो स्पष्टपणे नाकारला आहे. मात्र चीन-रशिया-उत्तर कोरिया या तिकडीची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकत्रित उपस्थिती, जागतिक भू-राजकारणात नव्या समीकरणांना तोंड फोडू शकते.