Sanjay Raut : मराठी माणसाची फूट नको! संजय राऊतांचे भाजप–काँग्रेसमधील मराठी नेत्यांनाही आवाहन
मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक ६७ मध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाल्याचे चित्र दिसून आले. या नाराजीबाबत मनसे उमेदवार कुशल धुरी यांनी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आज शिवसेना खासदार संजय राऊत हे कुशल धुरी यांच्या निवडणूक प्रचाराच्या उद्घाटनासाठी डी. एन. नगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. काही दिवसांपासून असलेली नाराजी, गैरसमज आणि अंतर्गत मतभेद दूर करत संजय राऊत यांनी दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा स्पष्ट संदेश दिला. “मराठी माणसाच्या राजकारणात फूट नको, एकजूट हवी,” असा ठाम सूर त्यांनी यावेळी लावला.
संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, उर्वरित दोन दिवसांत प्रचारात सक्रिय सहभागी व्हा आणि मनसे व शिवसेना ठाकरे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. तसेच प्रचारापासून दूर राहणाऱ्या किंवा नाराज असलेल्या शिवसैनिकांना थेट इशारा देताना ते म्हणाले, “आता वेळ निघून गेली तर पुन्हा संधी मिळणार नाही.”
याचवेळी त्यांनी केवळ ठाकरे गट किंवा मनसेतीलच नव्हे, तर भाजप किंवा काँग्रेसमधील मराठी माणसांनाही एक आवाहन करत सांगितले की, “मराठी माणसाच्या विरोधात जाणाऱ्या या पापात कोणीही सहभागी होऊ नये.” “अभी नही तो कभी नही” असे ठाम शब्द वापरत त्यांनी कुशल धुरी यांना निवडून आणणे ही काळाची गरज आहे, असे पदाधिकाऱ्यांना बजावले.
या कार्यक्रमातून दोन्ही पक्षांमधील समन्वय, एकजूट आणि सकारात्मक राजकीय वातावरणाचा स्पष्ट संदेश देण्यात आला. काही दिवसांपासून थंडावलेला प्रचार पुन्हा एकदा जोमात सुरू झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. अंधेरी पश्चिममध्ये आता मनसे–शिवसेना ठाकरे गटाची संयुक्त ताकद निर्णायक ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
