Pragya Satav's Resignation : प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसला धक्का, राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याची तयारी
Pragya Satav's Resignation: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज, 18 डिसेंबर रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा विधिमंडळाच्या सचिवांकडे दिल्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. काही दिवसांपासून त्यांच्या पक्षबदलाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आजच त्या अधिकृतपणे भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तरीही प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची संधी दिली होती. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. मात्र, कोरोनाच्या काळात त्यांच्या निधनामुळे पक्षाला मोठा धक्का बसला होता.
समर्थकांचा जोरदार पाठिंबा
प्रज्ञा सातव राजीनामा देण्यासाठी समर्थकांसोबत आल्या होत्या. हिंगोलीहून आलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत त्यांना पाठिंबा दर्शवला. ‘राजीव सातव अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजप कार्यालयातही दाखल झाले आहेत.
प्रज्ञा सातव यांची ओळख
डॉ. प्रज्ञा सातव या राजीव सातव यांच्या पत्नी असून त्या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर होत्या. त्या विधानपरिषदेच्या सदस्या होत्या. २०२१ मध्ये रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा त्या काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून आल्या. त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत होता. मात्र, आजच्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील प्रवास संपुष्टात आला आहे.
राजीव सातव कोण होते?
राजीव सातव हे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते आणि राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही महाराष्ट्रातून काँग्रेसचे मोजके खासदार निवडून आले होते, त्यापैकी ते एक होते. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते संसद आणि राज्यसभेपर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. युवक काँग्रेसपासून ते पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते.

