Lonavla Ekvira Devi Temple : एकविरा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या...
लोणावळा येथील कार्ला गावात जगप्रसिद्ध लेण्यांच्या कुशीत वसलेल्या एकवीरा देवीचे श्रद्धास्थान लाखो आगरी, कोळीबांधवांसाठी प्रसिद्ध मानले जाते. याठिकाणी अनेक भक्तगण एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी लांबचा प्रवास करत येतात. मात्र आता एकविरा देवीच्या दर्शनासाठी येताना भक्तांसाठी काही नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
आता दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी ड्रेसकोड लागू केला जाणार असून हा नियम 7 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. याची अधिकृत माहिती कार्ला एकवीरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खा. सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी दिली. यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली असून एकविरा देवस्थानाचे पावित्र्य राखण्यासाठी हा नियम लागू करण्यात येत आहे.
एकविरा देवी मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड काय?
एकविरा मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड ठरवण्यात आलेलं असून त्यात शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पँट व अंगप्रदर्शन कपड्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचसोबत महिलांकरता आणि मुलींकरता साडी, सलवार कुर्ता यांसारखे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली आहे. त्याचसोबत पुरषांसाठी धोतर, कुर्ता पायजमा, पँट शर्ट, टी-शर्ट असे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली आहे.