Leopard Attack : बिबट्याच्या भीतीमुळे सोयरिक जुळेना,शेकडो तरुणांची लग्नं रखडली,

Leopard Attack : बिबट्याच्या भीतीमुळे सोयरिक जुळेना,शेकडो तरुणांची लग्नं रखडली,

पोरं करती-धरती झालीयेत. आता कधी एकदा त्यांच्या डोईवर अक्षदा पडताहेत, या आतुरतेनं एकीकडं आई-वडिलांचा जीव व्याकुळलाय.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • बिबट्याच्या भीतीमुळे सोयरिक जुळेना

  • शेकडो तरुणांची लग्नं रखडली,

  • आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेडचे गावकरी चिंतेत

पोरं करती-धरती झालीयेत. आता कधी एकदा त्यांच्या डोईवर अक्षदा पडताहेत, या आतुरतेनं एकीकडं आई-वडिलांचा जीव व्याकुळलाय. तर दुसरीकडे ही पोरंही लग्नाची स्वप्नं रंगवतायेत खरं; पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेले बिबटे तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडताहेत. हे धक्कादायक वास्तव आहे बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावांतील. केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देऊन सोयरिक जोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला जात असल्याने गावांगावांत शेकडो तरुणांची लग्ने रखडली आहेत.

बिबट्यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक गावांतील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. विशेषतः आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत भयावह परिस्थिती आहे. रात्र असो की दिवस; कुठल्या क्षणी अन् कुणीकडून बिबट्या येऊन झडप घालेल, याचा भरवसा नाही. यामुळे इथले ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. गावा-शिवारात झुंडीनं फिरणाऱ्या बिबट्यांनी आजवर कैक गुरा-ढोरांबरोबरच लेकर-माणसांचाही जीव घेतलाय. यामुळे ग्रामीण भागात धडकी भरवणारे वातावरण आहे.

बिबट्यांचा दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही झाला आहे. गावांतील शेकडो तरुण 'वेल सेटल' असूनही त्यांना केवळ बिबट्यांच्या दहशतीमुळे मुली देण्यास नकार दिला जात आहे. सोयरा मिळेना म्हणून या तरुणांचे आई-वडील चिंताग्रस्त आहेत. तर गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर होत असल्याने तरुणांना निराशेने ग्रासले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com