Local Train Updates : आज देखील मुंबई लोकल वेळापत्रक कोलमडले! हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावर 30–35 मिनिटांनी उशीरा ट्रेन
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका लोकल वाहतुकीलाही बसला आहे. हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या वेळापत्रकापेक्षा उशिराने धावत असल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे.
हार्बर मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावत आहेत. त्यामुळे पनवेल, वाशी, नेरुळ व बेलापूर मार्गावरील प्रवासी हैराण झाले आहेत. मध्य रेल्वेवरील गाड्याही 20 ते 25 मिनिटांनी उशिराने धावत असून कर्जत व कसारा मार्गावर प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षेनंतर गाड्या मिळत आहेत.
पश्चिम रेल्वेवरील प्रवासी सर्वाधिक अडचणीत सापडले आहेत. बोरीवली, अंधेरी, दादर मार्गावरील लोकल्स तब्बल 30 ते 35 मिनिटांनी उशिरा धावत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली. ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचणे कठीण झाले असून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याचे कारण दिले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र गाड्यांच्या उशिरामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाचे ‘लोकलधडे’ सहन करावे लागत आहेत.