Jayakwadi Dam : मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार! जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढला
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. मंगळवारी धरणात तब्बल 53,334 क्युसेकने पाण्याची आवक नोंदली गेली असून, धरणातील पाणीसाठा वाढून 60.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरणाची पाणीपातळी सध्या 1,514 फूटांवर असून, एकूण साठा 2,056.083 दलघमी झाला आहे. त्यापैकी उपयुक्त म्हणजेच जिवंत साठा 1,317.977 दलघमी इतका आहे. 1 जून पासून आजपर्यंत जायकवाडीत सुमारे 22 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 4.06 टक्के पाणीसाठा शिल्लक होता, त्यामुळे यंदाच्या वर्षीची परिस्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट होते.
पाच वर्षांतील चौथ्यांदा जायकवाडी पूर्ण भरले जाण्याची शक्यता
जायकवाडी धरण 2019, 2020, 2021, 2022 आणि 2024 या चार वर्षांत 100 टक्के भरले आहे. मात्र, 2023 मध्ये केवळ 47.23 टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा झाला होता. यंदाही लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरण भरल्यास छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील पाच जिल्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांतील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा व औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याचा प्रश्न वर्षभर सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून पूरपरिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.