Gold Rate Increased : सोन्याच्या दरात लाखोंची उडी, सोनं खरेदी करायचं की नाही? ग्राहकांना मोठा फटका
देशातील सोन्याचा दर पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या भावाने सोमवारी (22 सप्टेंबर) मोठी उसळी घेतली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव तब्बल 2,200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,16,200 रुपये इतका झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर मानला जात आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या भावानेही आकाशाला गवसणी घातली आहे. सोमवारी चांदीत तब्बल 4,380 रुपयांची वाढ झाली असून, तिचा दर 1,36,380 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी हा दर 1,32,000 रुपयांवर होता. म्हणजेच, फक्त दोन दिवसांत चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात उंचावला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेली चढ-उतार, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे.
विशेष म्हणजे, या वर्षभरात चांदीच्या दरात तब्बल 52.04 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याच्या भावातही सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी धास्ती वाढली आहे, तर गुंतवणूकदारांसाठी हेच दर सुरक्षित आश्रयस्थान मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, आगामी सणासुदीच्या काळात दागिन्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. परंतु सध्याच्या उच्चांकामुळे सामान्य ग्राहकांना मात्र लग्नसराई आणि खरेदीसाठी खिशावर ताण येणार हे निश्चित आहे.