Sanjay Raut On Manoj Jarange Protest : "हे कसले मराठे, हे तर मराठी माणसाला कलंक" जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस अन् राऊतांचा रोख कोणाकडे?

आज मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा दिवस असून संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Published by :
Prachi Nate

आज मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा दिवस असून अजून देखील जरांगे आंदोलनासाठी ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, "काल मुंबईत अमित शाह येऊन गेले आणि त्यांच्यामागे भाजपचं लटांबर फिरत होतं. उपमुख्यमंत्री पद मिळालेलं त्यांच शेपूट देखील त्यांच्या मागे मागे करत होत. इतका मोठा गंभीर प्रश्न मुंबईत सुरू आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आले आहेत, त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात आंदोलनाला उपोषणाला बसले आहेत. हजारो संख्येने मराठा बांधव इथे आल्याने मुंबईतला बराचसा भाग विस्कळीत झाला आहे".

"त्यामुळे देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील अशी आमची अपेक्षा होती. जे गृहमंत्री कश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, 370 कलम हटवू शकतात. ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा त्या घटनेत बदल करू शकतात. मुंबईत येऊन त्यांनी एवढेच केलं की, भाजपला सांगितलं मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे, म्हणजे गुजराती व्हायला पाहिजे, मराठी व्हायला पाहिजे, हे त्यांनी काल सांगितलं. ते मराठ्यांचे प्रश्न तसेच ठेवून लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गेले आणि तिथे देवाला बोले मुंबईत मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मुंबई आम्हाला मिळू द्या".

पुढे देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे कसले मराठे, मराठी माणसाला कलंक आहेत हे सर्व लोक. काल सरकारच्या वतीने न्यायमूर्ती शिंदे वगैरे भेटले त्यांच्यात चर्चा सुरू आहे, ही चर्चा अजून किती काळ चालेल सांगता येत नाही, तोपर्यंत हे हजारो आंदोलक मुंबईत राहतील, ही मुंबई आपली आहे हे समजून त्यांनी मुंबईत थांबायला पाहिजे, ही मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची राजधानी आहे, या भावनेने सर्व मराठी बांधवांनी इथे राहिला पाहिजे. फडणवीस आणि अमित शाह यांच सरकार मराठी लोकांना मारायलाच निघालेलं आहे, हे बोलतात एक करतात दुसरं, मराठी माणसाला खतम करण्यासाठीच त्यांचं सरकार इथे आलेल आहे, सरकारमध्ये एकमेकांना खतम करण्याच्या भानगडीत मराठी माणसाला खतम करण्यासाठी निघाले आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com