शिकारीच्यावेळी झाडाची फांदी तुटली अन् बिबट्याचा झाला मृत्यू
भूपेश बारंगे|वर्धा : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धामकुंड जंगल शिवारात काल (ता.19)ला सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वनकर्मचारी गस्त घालत असताना झाडाखाली बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना लक्षात येताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढला एवढ्यात माकडाच्या पिलांची शिकार करताच अचानकपणे झाडाची फांदी तुटली आणि बिबट वरून खाली पडताच बिबट्याच्या डोक्याला गोट्याचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. माकडाच्या शिकारीच्या नादात बिबट्याला जीव गमवावा लागला. वनकर्मचारी जंगलात गस्त घालता असताना घटना उघडकीस येताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करत पंचनामा करण्यात आला.
बिबट मादी जातीचा असून दोन ते तीन वर्षांच्या बिबट असल्याचे सांगण्यात आले.आज दुपारच्या सुमारास बिबट्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.यावेळी बिबट्याच्या पोटात माकडाची शिकार केल्याची आढळून आले. शवविच्छेदन दरम्यान पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुरेश मांजरे, डॉ.सुरेंद्र पराते, डॉ राजेंद्र घुमडे यांनी केले. घटनास्थळी वर्ध्याचे राकेश शेपट,वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत , क्षेत्र सहाय्यक एस.एस.पठाण,एम.एस ठोंबरे,वनपाल चंद्रमणी रंगारी, पुरुषोत्तम काळसाईत उपस्थित होते.