Manoj Jarange Patil : मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, जरांगेंनी ठणकावलं
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक वळण येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या मराठा बांधवांना उद्देशून भाषण करत सरकारवर थेट हल्लाबोल केला. "सरकार वेळ लावत आहे, पण जितका विलंब वाढवाल तितका महाराष्ट्रातील जनतेचा संताप वाढत जाईल. लोक कामधंदे सोडून मुंबईकडे येणार आहेत. हे तर अजून आंदोलनाचा पहिला टप्पाही नाही. सात-आठ टप्प्यांत हे आंदोलन होणार असून तुम्हाला पुढील दिवसांत ते दिसेल," असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही. "आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलमध्ये टाका, मी जेलमध्येही उपोषण करीन. गोळ्या झाडलात तरी मी झेलायला तयार आहे. पण मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याशिवाय मी हटणार नाही," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी आंदोलक मराठा बांधवांना शांततेचे आणि संयमाचे आवाहन केले. "चेंबूर परिसरात जे बांधव रस्त्यावर आहेत, त्यांनी गाड्या पार्किंगमध्ये लावून थेट आझाद मैदानात यावे. एखाद्या बांधवाला जेवण मिळाले नसेल तर आपल्या गाड्यांजवळ जेवण शिजवून खा, गाडीतच विसावा घ्या. सकाळी पुन्हा आंदोलनात या. मुंबईतल्या स्थानिक मराठा बांधवांवर सरकार दबाव टाकत असेल, त्यामुळे त्यांनी जेवणाची सोय केली नाही तरी नाराज होऊ नका. संयमाने आंदोलन सुरू ठेवा," असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले, "सरकारला मराठा समाजाचा सर्वनाश करायचा आहे. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावीत, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, पुढे यावं असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते आरक्षणाचा प्रश्न टाळत आहेत. पण आम्ही हार मानणार नाही," असे ते म्हणाले.
प्रेसपरिषदेदरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. वारंवार उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन करत जरांगे पाटील म्हणाले, "सरकारला संवाद साधायचा आहे, पण त्यांना कळत नाही की आम्ही पाठीमागे हटणारे नाही. मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी संघर्ष अधिक तीव्र होणार आहे."
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणात लोक मुंबईकडे येणार असल्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी काही दिवसांत या आंदोलनाचा स्वरूप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.