Dwarkanath Sanzgiri : लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन झालं. वयाच्या 74व्या वर्षी दिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
द्वारकानाथ संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, स्तंभलेखन, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांनी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम केले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले.
द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले. भारताने इंग्लंडमध्ये 1983चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले. ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.