Russia Earthquake News : कामचाटकात निसर्गाचा कहर: तीव्र भूकंप आणि ज्वालामुखीचा स्फोट
रशियाच्या कामचाटका द्वीपकल्पाच्या परिसरात 8.8 तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला आहे . यानंतर 90 पेक्षा जास्त सौम्य भूकंपाचे झटके (Aftershocks) जाणवले, ज्यांची तीव्रता 4.0 ते 6.7 दरम्यान नोंदवण्यात आली. या घटनेनंतर प्रशांत महासागर किनाऱ्यावरील भागांना सुनामीचा तात्पुरता इशारा देण्यात आला होता, ज्याचा परिणाम हवाई, कॅलिफोर्निया आणि पेरूपर्यंत जाणवला.
मॉस्को टाइम्सच्या अहवालानुसार, भूकंपानंतर रशियाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक सौम्य झटके जाणवले. रात्री 9 वाजेपर्यंत कामचाटका किनाऱ्यालगत 90 हून अधिक धक्के आले होते. भूकंपीय केंद्राने सांगितले की, या झटक्यांमुळे सुनामीचा धोका निर्माण झाला नाही, मात्र सतर्कतेचा इशारा दिला गेला होता.
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर क्ल्युचेव्स्काया या युरेशियन खंडातील सर्वात उंच आणि सक्रिय ज्वालामुखीने पुन्हा हालचाल सुरू केली. उपग्रह चित्रांमध्ये लाव्हाचा प्रवाह स्पष्ट दिसून आला आहे. भूशास्त्रज्ञांनी स्फोटांचे आवाज नोंदवल्याचे सांगितले असून, संभाव्य धोका नसला तरी पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे सूचित करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्रीपर्यंत बहुतेक किनारी भागांतील सुनामीचे इशारे मागे घेण्यात आले. जपानची हवामान संस्था (JMA), चिलीची आपत्ती व्यवस्थापन संस्था सेनाप्रेड, तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं हवाई आणि अलास्कासाठी दिलेले इशारे advisory स्तरावर आणले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक परिणाम सेव्हेरो-कुरील्स्क बंदरावर झाला आहे. तेथे आलेल्या लाटांमुळे स्थानिक मासे प्रक्रिया केंद्र पाण्यात बुडाले. या लाटांचा जोर इतका होता की, समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 400 मीटर अंतरावरील द्वितीय महायुद्ध स्मारकापर्यंत पाणी पोहोचले, अशी माहिती महापौर अलेक्झांडर ओव्हस्यानिकोव यांनी दिली.