Eknath Shinde
Eknath Shinde Eknath Shinde

Eknath Shinde : महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! रविंद्र चव्हाणांसोबत 5 तास मॅरेथॉन चर्चा

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहे.
Published on

Eknath Shinde and Ravindra Chavan : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठी सध्या सर्व पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असून, दिवसरात्र बैठका आणि चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीतून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात तब्बल पाच तास सविस्तर चर्चा झाली. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक रात्री सुरू होऊन पहाटे चार वाजेपर्यंत चालली. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झाले असल्याची चर्चा आहे. यावर आज अधिकृत घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी वेगात सुरू केली आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत आमदारांना आपल्या मतदारसंघावर लक्ष ठेवण्याच्या, तर नगरसेवकांना निवडणूक होईपर्यंत आपल्या प्रभागात सक्रिय राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच भाजप आणि शिवसेनेमधील जागावाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युतीची आणि जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनाही सोमवारी तातडीने रत्नागिरीहून मुंबईला बोलावण्यात आले. मुंबईत दाखल होताच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. त्यामुळे दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत महायुतीत हालचाली वाढल्या असून, पुढील काही तासांत जागावाटपावरचा निर्णय अंतिम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com