BMC Election : एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी; शिवसेनेची लवकरच पहिली यादी जाहीर होणार
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी (BMC Election) उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असून, राजकीय पक्षांकडून महायुती व महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली असून, दुसरीकडे शरद पवार पक्षाची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना निवडणूक लढवणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक धोरण आखायला सुरुवात केली असून, नुकतेच त्यांनी मनसेच्या प्रकाश महाजन यांना आपल्या पक्षात घेतले आहे. प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजी नगरमधून दोन दिवसांपूर्वी मनसे सोडून शिंदे गटाची शिवसेना जॉईन केली. आता पक्षात प्रवेश केल्यावर महाजन यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज एकनाथ शिंदे मुंबईतील 60 माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये युबीटी आणि इतर पक्षातून आलेले माजी नगरसेवक समाविष्ट आहेत. यापैकी 2017 मध्ये निवडून आलेले 39 नगरसेवक आणि इतर पक्षाचे 21 नगरसेवक मिळून सध्या 60 माजी नगरसेवकांची फौज एकनाथ शिंदेंकडे आहे. शिंदेंनी या नगरसेवकांचे तिकिट फायनल केले असून, आज नंदनवन येथील निवासस्थानी त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या बैठकीत निवडणूक नियोजन, उमेदवारांची अंतिम यादी आणि काही नगरसेवकांना AB फॉर्म वाटप करण्यासंदर्भातील चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांना उमेदवारीसंबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महायुतीतील 207 जागांचे वाटप निश्चित झाले असून, भाजप 128 आणि शिवसेना 79 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरित 20 जागांसाठी बोलणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, आज रात्री किंवा उद्यापर्यंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील या निर्णायक टप्प्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे, आणि एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांशी संवाद साधून पक्षाचे आत्मविश्वास वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत. या युतीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
