Eknath Shinde On ShivSena 59th Vardhapan Din : 'हा वर्धापन दिन अस्सल शिवसेनेचा, दुसरा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज, 19 जून 2025 रोजी साजरा होत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन मेळावे आज पार पडणार आहेत.
Published by :
Rashmi Mane

शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज, 19 जून 2025 रोजी साजरा होत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन मेळावे आज पार पडणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाबेह ठाकरे गट) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन किंग्ज सर्कल येथील श्री षण्मुखानंद सभागृहात पार पडत असून शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, दीपक केसरकर, संजय शिरसाट, उदय सामंत, रविंद्र वायकर, गजानन किर्तीकर, निलम गोर्हे, प्रकाश आबिटकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांसह इतर शिवसेनेचे मान्यवर उपस्थित आहेत.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो, 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. आज आपला 59 वा वर्धापन दिन आहे. आज दुसरा कुठंतरी मेळावा सुरू आहे. पण हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा, हा फरक आहे. म्हणून अस्सल शिवसेना, फगवा, जनतेचा आशिर्वाद तुमच्याकडे. हिंदुत्वाचा आवाज, 80 टक्के समाजकारण म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे एकजूट, म्हणजे वज्रमूठ, म्हणजे धनुष्यबाण, म्हणजे आपला प्राण. वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो."

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "काल माझ्याकडे सात राज्यांचे प्रमुख आले होते. तिथे शिवसेना वाढतेय. ही वाढ खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची, तुमच्या मेहनतीची आहे. शिवसेनेचं नाव आपण जपलं. त्यामुळे शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे. 2014 साली शिवसेनेनं 282 जागा लढवल्या. 63 जागा जिंकल्या. 2019 मध्ये 224 जागा लढवल्या, 56 जागा जिंकल्या. तर 2024 ला 80 जागा लढवल्या आणि 60 जिंकल्या. उबाठाने 85 जागा लढवल्या व 20 जागा जिंकल्या. स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के. कारण विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलं. ज्या जिंकल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीवर, कारण हक्कांच्या मतदारांनी त्यांना टाटा-बायबाय केलं आहे. जनतेनं त्यांची बिन पाण्यानं हजामत केली आहे. आपल्याकडे आत्मविश्वास त्यांच्याकडे अहंकार, त्यांचा फणा 2024 ला जनतेनं ठेचला आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली, कमरेचं सोडून डोक्याला बांधलं. मराठी माणसाचा विश्वासघात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला. वेगाने रंग बदलणारा सरडा राज्यानं पाहिला. 'मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार, ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार'. हा महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे. बाळासाहेब असते तर त्यांना उलटं टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही. हिंदुत्व, मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे किती लाचार झाले आहेत. 'युती करता का माझ्याशी...'; परिस्थिती कशी बदलते हे सांगू शकत नाही. लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी प्रतारणा होणार नाही, सत्तेसाठी तडजोड करणार नाही. आपण 365 दिवस काम करतो, काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची आठवण येते."

"आता आगामी निवडुकीतसुद्धा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसासाठी काय केलं याचा हिशोब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मग बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते. कधीही धरायचं, कधीही सोडायचं. अस नाही चालतं, त्यामुळेचं जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवली. देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी हे तुमचं हिंदुत्व. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं, त्यांनाच जवळ केलं, हे काय आहे. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. आम्ही सत्तेसाठी कधीही मराठी सोडणार नाही. भाषणात म्हणाले कील मी, मरे हुए को क्या मारना है, जनतेनं निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला आहे. नुसताच वरून शोर, मनगटात येत नाही जोर. नुसतंच तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही, त्याला मनगटात जोर लागतो. आमच्या नादाला लागू नका, तुम्हाला अडीच वर्षात दाखवलं आहे. तुमचे टांगा पलटी, घोडे फरार करून दाखवलं आहे. हा बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा एकनाथ आहे. हम किसी को छेडते नाही, और छेडेंगे तो छोडते नही."

हेही वाचा

Eknath Shinde On ShivSena 59th Vardhapan Din : 'हा वर्धापन दिन अस्सल शिवसेनेचा, दुसरा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
ShivSena 59th Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापनदिनी संजय राऊतांची सरकारवर जहरी टीका, म्हणाले, "मनोरंजन..."
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com