Eknath Shinde On Manoj Jarange : "...आरक्षण मराठा समाजाला देणार नाही"! मुंबईत मनोज जरांगेंचं आंदोलन पुन्हा पेटलं, एकनाथ शिंदे म्हणाले...

Eknath Shinde On Manoj Jarange : "...आरक्षण मराठा समाजाला देणार नाही"! मुंबईत मनोज जरांगेंचं आंदोलन पुन्हा पेटलं, एकनाथ शिंदे म्हणाले...

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
Published by :
Prachi Nate
Published on

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आझाद मैदान गाठलं आहे. मानखुर्द आणि चेंबूरमध्ये झालेल्या भव्य स्वागतानंतर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. शेकडो गाड्यांचा ताफा, हातात झेंडे आणि घोषणाबाजी करत आंदोलक आझाद मैदानावर दाखल होताच संपूर्ण परिसर मराठा आरक्षणाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. मैदान गच्च भरलं असून, संध्याकाळपर्यंत आंदोलनाची परवानगी मिळाली आहे.

याचपार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “2016-17 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण दिलं. हायकोर्टात ते टिकून राहिलं, पण सुप्रीम कोर्टात तेव्हा महाविकास आघाडी सरकार असताना बाजू नीट मांडली गेली नाही. परिणामी आरक्षण रद्द झालं. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा 10% आरक्षण दिलं. आजही ते लागू आहे”.

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणार नाही. ओबीसी असो वा अन्य समाज, त्यांचा हक्क अबाधित ठेवत कायद्याच्या चौकटीत बसून जे काही शक्य आहे ते दिलं जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचा आमचा निर्धार आहे.” मराठा तरुणांच्या प्रगतीसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, बिनव्याजी कर्जवाढ (10 लाखांवरून 15 लाखापर्यंत), विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, दर महिन्याला घरभाडे योजना, यूपीएससी-एमपीएससीसाठी प्रशिक्षण इत्यादी उपाययोजना महायुती सरकारने केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे यांनी विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. “आम्ही दिलेलं आरक्षण टिकवलं नाही, तरी टीका करतात. समाजाच्या हक्कासाठी आम्ही हिम्मत दाखवली. त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्यांनी आरक्षणासाठी खरं धाडस दाखवलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती”, अशी टीका शिंदे यांनी केली. “आम्ही बोलतो ते करून दाखवतो. विकास हा आमचा अजेंडा आहे. कुणाचंही नुकसान न होता मराठा समाजाला न्याय मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असे स्पष्ट शब्दांत आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com