Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच जुन्या पेन्शन योजनेवरील प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न देखील सुरु असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्याचे आम्हाला समाधान आहे. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे उदात्त कार्य मोकळेपणाने करावे. शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांची 30 हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सांगितले.

जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला एकनाथ शिंदे यांनी आज उपस्तिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com