Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे ४८ तास शिल्लक असतानाच आयाराम–गयाराम राजकारण जोरात सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे गटाला हादरे देणाऱ्या एकनाथ शिंदेंनाच आता आपल्या जवळच्या नात्यातून धक्का बसला आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थेट एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांनी प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आशिष माने हे एकनाथ शिंदे यांच्या मेहुणीचे सुपुत्र असून, त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे शिंदे गटासाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रवेश झाल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीकडून त्यांना थेट उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. आशिष माने हे चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला केवळ वैयक्तिक नव्हे तर स्थानिक राजकारणातही फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ शिंदेंच्या भाच्यालाच नाही तर भाजपच्या एका माजी मंत्र्यालाही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता अधिकच वाढल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या अगदी तोंडावर सुरू असलेल्या या पक्षप्रवेशांमुळे आणि फोडाफोडीमुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

आजच मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली असून, दुसरीकडे शरद पवार गट, ठाकरे गट आणि इतर पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. कोण कुणासोबत जाणार, कोण स्वबळावर लढणार आणि कोणाची युती तुटणार, याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा धक्का केवळ राजकीय नसून कौटुंबिक स्तरावरही महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा राजकीय घडामोडींचा खेळ पुढे कोणता वळण घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com