Mumbai Elphinstone Bridge : मुंबईकरांनो, उद्यापासून एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणता?
एल्फिन्स्टन पूल 2 वर्षांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुर्नबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात येणार आहे.
जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिजची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदलही करण्यात येणार आहेत. उद्या रात्री 9 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. एमएमआरडीएने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून नवीन पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे.
वाहने मडके बुवा चौकापासून (परळ टी.टी. जंक्शन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे थेट कृष्णा नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, भारत माता जंक्शन मार्गे पुढे जातील. महादेव पालव रोडवर उजवीकडे वळून, करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून, आणि नंतर शिंगटे मास्टर चौकातून उजवीकडे वळून लोअर परळ ब्रिजवर पोहोचतील.
खोदादाद सर्कल पासून वाहने उजवीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे जातील. तसेच संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) येथून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शनपासून डावीकडे वळून लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जातील. डावीकडे वळून महादेव पालव रोड आणि करी रोड रेल्वे ब्रिज मार्गे गंतव्यस्थानावर पोहोचता येईल.
महादेव पालव रोड (करी रोड रेल्वे ब्रिज) हा कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) पासून शिंगटे मास्टर चौकापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि विरुद्ध दिशेने दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहणार असून दोन्ही रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुल्या राहणार आहेत.
तसेच संत रोहिदास चौक पासून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शन येथे डावीकडे वळतील. त्यानंतर, वाहने महादेव पालव रोडवर डावीकडे वळतील आणि करी रोड रेल्वे ब्रिजमार्गे भारतमाता जंक्शनकडे जातील.