Energy Efficient solutions : राज्यातील नव्या इमारतींमध्ये शीतकरणासाठी ऊर्जा कार्यक्षम उपाय; कार्बन उत्सर्जन रोखण्यावर भर
"शहरे हवामान बदलाचे केंद्रबिंदू ठरत आहेत आणि त्यात इमारतींच्या कार्बन उत्सर्जनाचा मोठा वाटा आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात 'शीतकरण कृती आराखडा' लागू करण्यात आला असून, नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम शीतकरण प्रणाली वापरणे बंधनकारक केले जात आहे," अशी माहिती राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक डॉ. अभिजित घोरपडे यांनी दिली.
'भवताल फाउंडेशन' आणि 'मायक्रो इनोटेक' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भवताल टॉक' या परिसंवादात डॉ. घोरपडे बोलत होते. 'हवामान बदलाचे आव्हान' या विषयावर झालेल्या चर्चेत हवामानतज्ज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल आणि डॉ. विनीत कुमार सिंग यांनीही सहभाग घेतला.
डॉ. घोरपडे म्हणाले की, "राज्यात हवामान बदलांमुळे उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळे यांसारख्या घटनांची तीव्रता व वारंवारता वाढली आहे. काही जिल्ह्यांना आता पूर आणि दुष्काळ दोन्ही संकटांचा सामना करावा लागत आहे."
डॉ. कोल यांच्या मते, "कार्बन उत्सर्जनातील वाढ समुद्राचे तापमान वाढवते, परिणामी पावसाचे स्वरूप बदलते आणि शेतीवर विपरित परिणाम होतो. समुद्राची पातळी दर दशकाला वाढत असून, किनारपट्टीवरील जमीन पाण्याखाली जाते आहे."
डॉ. विनीत सिंग यांनी चक्रीवादळांबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, "अरबी समुद्रात वादळांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत वेळेत आणि अचूक अंदाज देणाऱ्या प्रणाली अधिक प्रभावी बनवणं गरजेचं आहे." या कार्यक्रमात पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धा जिंकलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.