Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
Uddhav Thackeray On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देतानाच त्यांनी मोदींवर जोरदार टीकाही केली.
मातोश्री येथे धाराशिवमधील काही कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदी माझे दुश्मन नाहीत. मी त्यांना दुश्मन मानत नाही. ते मला शत्रू मानत असले तरी मी त्यांना दुश्मन मानत नाही. मात्र, त्यांनी शिवसेना संपवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो कोण सहन करू शकत नाही. मोदींच्या मनात पाप असलं तरी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या हाती देशाचा कारभार आहे. तो चांगला व्हावा हीच इच्छा आहे.”
भूतकाळातील मोदींच्या आश्वासनांवरही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मोदींनी अनेक घोषणा केल्या होत्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट सिटी, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात, अच्छे दिन अशा घोषणा केल्या. मात्र आज त्या सर्व घोषणांची भूतं त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत.”
दरम्यान, शिंदे गटात गेलेले काही माजी नगरसेवक परत येण्यास उत्सुक आहेत, अशा प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “ते तुम्हाला येणाऱ्या दिवसांत दिसेलच.”
राज ठाकरे यांच्याशी झालेल्या अडीच तासांच्या भेटीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, “तुमचा प्रॉब्लेम काय आहे? गेलो तरी प्रॉब्लेम, नाही गेलो तरी प्रॉब्लेम. गणपतीला त्याने मला बोलावलं होतं. तो माझ्या वाढदिवसाला आलेला. मावशी त्यावेळी बोलल्या की, असा येत-जात रहा. एवढ्या वर्षांनी आमचं येणं-जाणं सुरू झालं आहे. यात चुकीचं काय आहे?”