Donald Trump: ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला भारताचा प्रतिकार; अमेरिकेला आर्थिक धक्का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावून आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, भारताने या अटी मान्य न करता वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पावलांचा थेट फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता असून, काहीही झाले तरीही भारत अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर टॅरिफ लावला, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासमोर काही अटी ठेवल्या असून, जोपर्यंत टॅरिफचा निर्णय होत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणत्याही प्रकारची व्यापार चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्याबाबत ट्रम्प नाराज आहेत. मात्र, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशाबाबत अमेरिकेची भूमिका वेगळी आहे. चीनच्या टॅरिफबाबत 90 दिवसांनी पुनर्विचार होणार असून, मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशावर टॅरिफ खूपच कमी आहे, ज्यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.
दरम्यान, भारताने अमेरिकन टॅरिफमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी युरोपियन युनियन आणि आसियान बाजारपेठेकडे वळण्याची तयारी केली आहे. हा अमेरिकेला मोठा धक्का ठरू शकतो. यासोबतच, अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबाबतही भारत लवकरच निर्णय घेऊ शकतो. भारताच्या या पावलांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.