Mumbai Municipal Election : मुंबई महापालिकेत रंगतदार लढती; कुठे ठाकरे विरुद्ध शिंदे, कुठे भाजप विरुद्ध मनसे
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत केवळ पक्षांमधील नव्हे, तर एकाच विचारसरणीतील गटांमधील संघर्षही ठळकपणे दिसून आला. विशेषतः ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यातील थेट सामना अनेक प्रभागांत रंगला असून, या लढतींचा थेट परिणाम मुंबई महापालिकेच्या सत्तासमीकरणांवर होणार आहे.
प्रभाग क्रमांक १८५ मध्ये ठाकरे गटाचे टी. एम. जगदीश आणि भाजपाचे माजी महापौर रवी राजा यांच्यात थेट लढत झाली. हा प्रभाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला. प्रभाग १९२ मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात सामना रंगला. मराठी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या या लढतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
प्रभाग १९४ मध्ये ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर आमनेसामने आहेत. शिवसेनेतील फूटीनंतर प्रथमच दोन्ही गटांमध्ये इतकी थेट टक्कर या प्रभागात पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे प्रभाग २०४ मध्ये शिंदे गटाचे अनिल कोकीळ आणि ठाकरे गटाचे किरण तावडे यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली.
प्रभाग २०९ मध्ये शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि मनसेच्या हसीना माहीमकर यांच्यात सामना झाला. महिला उमेदवारांमधील ही लढतही चर्चेचा विषय ठरली. प्रभाग १९१ मध्ये ठाकरे गटाच्या विशाखा राऊत आणि शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर यांच्यात थेट संघर्ष झाला आहे.
मुंबईतील राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या प्रभाग १९९ मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि शिंदे गटाच्या वंदना गवळी यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रभाग १९६ मध्ये ठाकरे गटाच्या पद्मजा चेंबूरकर आणि भाजपाच्या सोनाली सावंत यांच्यात लढत झाली आहे.
प्रभाग २०८ मध्ये ठाकरे गटाचे रमाकांत रहाटे आणि शिंदे गटाचे विजय लिपारे आमनेसामने असून, प्रभाग २२२ मध्ये ठाकरे गटाचे संपत ठाकूर आणि भाजपाच्या रिटा मकवाना यांच्यात थेट सामना रंगला आहे.
या सर्व प्रमुख लढतींचे निकाल मुंबई महापालिकेतील सत्तेची दिशा ठरवणारे ठरणार असून, मतमोजणीनंतर कोणत्या पक्षाचा वरचष्मा राहतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
