Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

शिंदे-अजितदादांनी परवानगी दिल्यास फडणवीस गडचिरोलीसाठी इच्छुक

गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून आता महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोलीचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by :
Published on

महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्तास्थापन झाली आहे. मात्र, सत्तेचा सारीपाटीची घडी नीट घालताना महायुतीमध्ये कोणत्या कोणत्या कारणावरून लुटूपुटूची लढाई सुरु आहे. आधी मंत्रिपद त्यानंतर खातेवाटप आणि आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता महायुतीत पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवू इच्छितो असं मोठं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून आता महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

एकेकाळी गडचिरोलीचे पालकमंत्री पद म्हणजे काटेरी मुकुट समजलं जायचं. आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्षलवाद्यांची गंभीर समस्या यामुळे गडचिरोलीचे पालकत्व घेण्यास नेते इच्छुक नसायचे. मात्र, आता त्याच गडचिरोली जिल्ह्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गडचिरोली जिल्हा का महत्त्वाचा?

  • गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्तांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी गृहखात्याचा महत्त्वाचा उपक्रम तत्कालीन गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी राबविला होता. यामार्फत फडणवीसांनी अनेक नक्षलवाद्यांना मुख्यप्रवाहात आणण्याचं कार्य केलं.

  • गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून पहिला जिल्हा असल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी याआधी केलं होतं. गडचिरोलीच्या विकासासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवण्यात आले आहेत. तसेच हा जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीने सधन आहे. गडचिरोलीतील सर्वात मोठी लोहखनिजाची खाण असलेल्या सुरजागड इस्पात प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन जुलै २०२४ मध्ये केलं आहे. यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी उपक्रम राबवले आहेत.

पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का मानलं जातं?

पालकमंत्रिपद हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने हे पद महत्त्वाचं मानलं जातं. कारण पदानुसार या व्यक्तीकडे अधिकारही येतात, जे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आता महायुतीमध्ये महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कोण पालकमंत्री असेल यावरून चर्चा रंगल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पालकमंत्री पदासंदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही पक्षांसोबत बसून काय निर्यण घेतात पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. त्यांनी जर बीडला जायला सांगितलं तर बीडला जायला तयार आहे. साधारणपणे मुख्यमंत्री कोणतं पालकत्व ठेवत नाहीत. मात्र, गडचिरोलीचं पालकत्व स्वत: कडे ठेवू इच्छितो. मात्र, अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली तरच गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com