शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पर्दाफाश: दोन कंपन्या व पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल

शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पर्दाफाश: दोन कंपन्या व पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी दोन कंपन्या आणि दोन पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटी रुग्णालयातही बनावट औषधांचा वापर

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात वापरण्यात आलेल्या औषधांची चाचणी केली असता, त्यातील काही औषधे बनावट व अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात घाटी रुग्णालयाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

कोणाविरोधात गुन्हा दाखल?

या प्रकरणात कोल्हापूर येथील सुरेश दत्तात्रय पाटील (विशाल इंटरप्राइजेस), ठाण्याचे मिहिर त्रिवेदी आणि विजय शैलेंद्र चौधरी, तसेच केरळमधील स्कायक्युअर सोल्युशन कंपनी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कशी उघड झाली फसवणूक?

अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात २५,९०० बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर घाटी रुग्णालयात केलेल्या तपासणीत ३२ प्रकारच्या औषधांमध्ये संशयास्पद बाबी समोर आल्या. विशेषतः ‘क्यूरेक्सिम २००’ आणि ‘सेफिक्झिम २००’ या गोळ्या बनावट असल्याचे प्रयोगशाळा चाचणीत स्पष्ट झाले. ही औषधे विशाल इंटरप्राइजेसमार्फत रुग्णालयात पुरवण्यात आली होती.

कारवाईचा बडगा

संबंधित पुरवठादारांचे पेमेंट तत्काळ गोठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com