Swapnil Joshi : "सुमारे पाच वर्षांपूर्वी मी..." मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन स्वप्निल जोशीने सांगितला 'तो' अनुभव
महाराष्ट्रात सध्या मराठी भाषेच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर ठाम भूमिका घेतल्यानंतर आता कला, साहित्य आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींचेही प्रतिपादन पुढे येत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणेनंतर आता प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी यांनीही या मुद्द्यावर परखड भाष्य केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात वनविकास मोहिमेसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेले स्वप्निल जोशी यांनी, भाषेच्या सक्तीच्या संदर्भात आपलं मत मांडलं. "हिंदी शिकण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांनी ती नक्की शिकावी, परंतु ती सक्तीची करू नये. मी एक मराठी व्यक्ती म्हणून असे मानतो," असं स्वप्निल जोशी यांनी स्पष्ट केलं. स्वप्निल जोशी यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी राज्यात मराठी भाषेला अधिक महत्त्व देण्यात यावं, आणि कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये, यावर भर दिला.
दरम्यान, ऑनलाईन जाहिरातींबाबत विचारल्यावर स्वप्निल जोशी यांनी खुलासा करत सांगितलं की, “सुमारे पाच वर्षांपूर्वी मी काही ऑनलाईन जाहिराती केल्या होत्या. त्यानंतर काही संघटनांनी आणि व्यक्तींनी त्यावर आक्षेप नोंदवला. त्यामुळे मी स्वतःहून अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये काम करणे थांबवले आणि भविष्यातही अशा जाहिरातीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.” मराठी भाषेचा मुद्दा आणि त्यावर कलाकारांचे वक्तव्य यामुळे सामाजिक पातळीवर या चर्चेला वेग आला आहे.