शेतकरी आक्रमक; 'जलसमाधी आंदोलना'साठी एक हजार शेतकऱ्यांसह तुपकर आज मुंबईकडे रवाना होणार

शेतकरी आक्रमक; 'जलसमाधी आंदोलना'साठी एक हजार शेतकऱ्यांसह तुपकर आज मुंबईकडे रवाना होणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आज एक हजार शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आज एक हजार शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात जलसमाधीआंदोलन करण्यासाठी एक हजार शेतकऱ्यांसह तुपकर आज मुंबईकडे रवाना होणार आहेत.

खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावा. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा. शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अरबी समुद्रात ते शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत. 60 ते 70 गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून सकाळी साडेनऊ वाजता मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. या ताफ्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com