Shaktipeeth Mahamarg: पानीपत करू मात्र शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा गंभीर इशारा
राज्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महामार्गामुळे मोठं नुकसान होणार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. येत्या 24 जानेवारीला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग विदर्भातील वर्धा ते गोवा राज्याला जोडणारा असणार आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे. साधारण 800 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावामधून जात असून त्यामधील अनेक गावातील बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. नदी काठावरील गावात महामार्गाची उंची वाढल्यामुळे पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे. अनेक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते या महामार्गात जमीन गेल्याने भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सांगलीमधील शेतकऱ्यांचा का आहे विरोध?
शक्तिपीठ महामार्गाला सांगलीतील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाकडून जमीन मोजणीचा घाट घातला जात आहे. त्यास आमचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला हा महामार्ग उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सोन्यासारख्या जमिनी रस्त्यामध्ये बाधित होणार आहेत. शासनाचा अधिकारी मोजणी करायला आल्यास त्याला विहिरीत टाकण्याचा गंभीर इशारा शेतकरी घनशाम नलावडे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गात येणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची विनंती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी काढून घेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बेरोजगार, भूमिहीन, उद्ध्वस्त करण्याचं धोरण थांबवावं असं म्हणत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला आहे. अन्यथा जो कोणी शासनाचा अधिकारी भूसंपादन करण्यास येईल त्याचा मुडदा पाडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे या शेतकऱ्याने दिला आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-
पानीपत करू मात्र महामार्ग होऊ देणार नाही- नांदेडच्या शेतकऱ्यांचा इशारा
आज नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेऊन या महामार्गाला विरोध केला आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हा असो किंवा संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्गासाठी शासनाचा अट्टाहास का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. गुत्तेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांना जगवण्यासाठी आमच्या मढ्यावर बसून हा महामार्ग काढणार आहात का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही पानीपत करू मात्र महामार्ग होऊ देणार नसल्याचा गंभीर इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.