शेतकऱ्यांची पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर धडक
शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. भूसंपादन, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत द्या आणि इतर मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नोएडामध्ये मोर्चा काढला आहे. नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाला 6 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. नोएडा इथल्या दलित प्रेरणा स्थळावर हे शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. दुसरीकडे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनीही एमएसपी आणि इतर मागण्यांबाबत 6 डिसेंबरला दिल्लीवर मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली आहे. हे शेतकरी पंजाबच्या शंभू सीमेवर अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. नोएडा येथील भूसंपादनासाठी चौपट मोबदला द्यावा आणि 10 टक्के भूखंड द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसंच जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्वसनाचे सर्व फायदे मिळावेत. त्यांनाही पेन्शन देण्यात यावी. दरम्यान 2020-21 च्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी आणि खटले मागे घ्यावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे.