1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग बंधनकारक; अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल
1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
वैध आणि कार्यरत ई-टॅग किंवा फास्ट-टॅग नसलेल्या वाहनांनी फास्ट-टॅगसाठीच्या वाहनांच्या मार्गिकेत प्रवेश केल्यावर दुप्पट शुल्क भरावे लागेल. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर पथकर एक एप्रिल 2025 पासून ई-टॅग किंवा फास्ट-टॅगद्वारे भरणे बंधनकारक असणार असून रोख, स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड पथकर भरायचा असेल तर दुप्पट रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या टोलनाक्यावर 2021 पासून पथकर वसूली फास्टॅगने करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रात त्याची सक्ती करण्यात आलेली नव्हती, आता पथकर केवळ ई-टॅग किंवा फास्ट-टॅगद्वारे भरणे बंधनकारक असणार आहे.