Raj Thackeray : 'जागांवरून नाही, मुंबईसाठी लढा', राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आणि ठाम आवाहन केलं आहे. “कुणाला किती जागा मिळाल्या, कोणाला उमेदवारी मिळाली किंवा मिळाली नाही, यावरून कोणीही नाराज होऊ नका. व्यक्तिक स्वार्थ हा मराठी माणसाच्या हितापुढे शुल्लक आहे,” असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आज मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही लढाई व्यक्तीची नाही, तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. कुणाच्या व्यक्तिक स्वार्थाकडे पाहू नका. एकत्र या, संघटित व्हा आणि दुसऱ्यांचे स्वप्न गाडण्यासाठी ताकदीने मैदानात उतरा.” मुंबई महापालिकेवर मराठी माणसाचा झेंडा फडकवणं हाच आपला मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, निवडणुकीत मतभेद, नाराजी, अपेक्षा या गोष्टी स्वाभाविक असतात. मात्र, या गोष्टींमुळे संघटना कमकुवत होऊ देऊ नका. “आज जर आपण एकत्र उभे राहिलो नाही, तर उद्या मुंबईत मराठी माणसाला विचारणारा कोणी उरणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील प्रश्न, मराठी माणसाचं हक्काचं घर, रोजगार, व्यवसाय आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले. “निवडणूक म्हणजे केवळ जागा आणि सत्ता नाही, तर भविष्य घडवण्याची संधी आहे,” असं सांगत त्यांनी सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांना शिस्त, संयम आणि एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं. “स्वार्थ बाजूला ठेवा, मुंबईसाठी लढा,” असा स्पष्ट संदेश देत राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेची भूमिका ठामपणे मांडली आहे.
