Diwali Gold-Silver Rate : चांदी स्थिरावणार, तर सोने...! आज नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावाबाबात मोठी अपडेट
गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या- चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी ग्राहकांनी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला आहे. दरम्यान आज नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर चांदीचे भाव एक लाख 60 ते एक लाख 70 हजारांपर्यंत टिकून राहू शकतात अशी शक्यता वर्तावली जात आहे.
तसेच चांदीसाठीचा 25 हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे. चांदीच्या भावात सात हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख 71 हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्याचसोबत धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या भावात तीन हजार 300 रुपयांची वाढ होऊन ते एक लाख 31 हजार 500 रुपयांवर पोहोचले होते.
मात्र, ऐन मुहूर्तावर सोन्याच्या भावात थेट तीन हजार रुपयांची घसरण होऊन ते एक लाख 28 हजार 500 रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र, सोन्याच्या भावात तेजी राहणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
मागील दिवाळीत 80 हजार रुपये असलेला सोन्याचा भाव यंदा सव्वा लाखांच्या घरात असून चांदीच्या दरालाही नवी झळाळी मिळाली असून चांदीच्या दराने ही आपला नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर सोन खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांची चिंता वाढली आहे. दरम्यान येत्या दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.