बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार; आरोपीला अटक
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराची घटना घडल्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
होम प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली. या गोळीबारात एकाच्या पायात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पैशांच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली की, यात चौघे जण होते पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली, चौघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत. गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे, दोन गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहेत.
यासोबतच पैशांच्या देवाण-घेवाण आणि पैशांचा वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादातून गोळीबार झाला दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे. असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा आता तपास सुरु आहे.