Pune : किरकोळ कारणावरून पुण्यात गोळीबार; हल्ल्यात एक तरुण जखमी
अमोल धर्माधिकारी, पुणे
किरकोळ कारणावरून पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर हा गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून निलेश पिंपळकर असे फिर्यादीचे नाव आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे असे आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेल जवळ घडला. पोलिसांना घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा १ जिवंत राऊंड आणि २ केसेस जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश आणि रोहीत हे दोघे ही एकाच भागात राहायला असून एका मोटर कंपनीमध्ये ते काम करतात. रोहित याला कंपनी मधुन कामावरुन काढुन टाकले. या गैरसमजुतीतून रोहितने फिर्यादी याला महाबळेश्वर हॉटेल समोरील ४५ अव्हेन्युव बिल्डींग जवळ बाणेरकडे जाणारे रोड लगत भेटण्यास बोलवून घेतलं.
फिर्यादी हे त्यांचं मित्र आकाश बाणेकार आणि रोहित हे बोलत असताना त्या ठिकाणी आरोपी आदित्य दिपक रणावरे, सागर लक्ष्मण बनसोडे यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन बंदुकीतून गोळीबार केला. हे आरोपी रोहित चे मित्र होते. या हल्ल्यात फिर्यादी यांचा मित्र आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.