Shivrajyabhishek Ceremony : किल्ले रायगडावर शिवप्रतिमेचे तुलादान; मेघडंबरीला आकर्षक फुलांची सजावट
सोमवारी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर तुला दान करण्यात आले. शिवराज्याभिषेकाच्या पुजाविधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शिवप्रतिमेची यावेळी तुला करण्यात आली. खाद्य पदार्थ, ड्रायफुड, शालेय शैक्षणिक साहित्य आदीचे तुलादान यावेळी करून त्याचे वाटप करण्यात आले. होळीच्या माळावर विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक आखाड्यांनी पारंपारिक लेझिम कला सादर केली.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकण कडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडावर उद्या, सोमवारी 9 जून रोजी साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा केला जाणार आहे. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली आहे.
तिथीनुसार साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारा असून, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले या समारंभाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याकरिता वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी रायगड किल्ल्यावर भेट देत येथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. कोकण कडा मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी अन्नधान्य व इतर रसद शनिवारी (ता. 7) गडावर पोहोच केली आहे. रविवारी (ता. 8) गडदेवता शिरकाई देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सोमवारी सकाळी साडेसहा वाजता रायगड जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या ठिकाणी ध्वजपूजन केले जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पालखीचे सात वाजता प्रस्थान होणारा असून, सकाळी आठ वाजता नगारखान्यासमोर भव्य ध्वजारोहण केले जाणार आहे. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये नऊ वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पौरोहित्य जबाबदारी श्री पंचाक्षर माहेश्वर (जंगम) पौरोहित्य मंडळ यांच्याकडे देण्यात आलेली आहे. छत्रपती शिवरायांना रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना दिली जाणार आहे. सकाळी 10 वाजता शाही शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. येणाऱ्या शिवप्रेमींकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, यानंतर दुपारी साडेबारा वाजता सर्व शिवप्रेमींच्या वतीने गड स्वच्छता केली जाणार आहे.