बंगळुरूमध्ये माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह
राज्याचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचा मृतदेह रविवारी त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला झाल्याचे दिसून आले असून, ही घटना त्याचा एचएसआर लेआउट परिसरातील निवासस्थानी घडली आहे.
माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश हे त्यांच्या पत्नी व मुलीसोबत राहत होते. घटनेच्या वेळी घरात ते तिघेच उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर त्यांच्या पत्नीने स्वतःला मुलीसह एका खोलीत बंद केले होते.
या प्रकरणात पोलिसांनी पत्नीवर संशय व्यक्त करत चौकशी सुरू केली आहे. घटनेच्या ठिकाणी आढळलेल्या एका धारदार वस्तूचा वापर गुन्ह्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेपूर्वी काही दिवस अगोदर पत्नीने स्वतःच्या जीवाला धोका आहे असे कळवले होते अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.
ओम प्रकाश हे 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कर्नाटकातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम पाहिलं. पोलीस दलातील त्यांचा अनुभव अत्यंत व्यापक होता – त्यांनी आर्थिक गुन्हे, गुप्तचर विभाग, CID, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, तसेच लोकायुक्त या विभागांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. 2015 ते 2017या कालावधीत त्यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नेतृत्व दिलं होतं. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.