SatyaPal Malik : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
देशाचे ज्येष्ठ राजकारणी आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज सकाळी दिल्लीतील आरएम रुग्णालयात निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सत्यपाल मलिक यांची राजकीय वाटचाल अत्यंत बहुपेडी होती. त्यांनी भारतीय संसदेचे सदस्य म्हणून तसेच विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी बिहार, ओडिशा, जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय अशा विविध राज्यांमध्ये राज्यपालपद भूषवले.
विशेषतः ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत ते जम्मू-काश्मीरचे शेवटचे राज्यपाल होते. याच काळात केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी तरतूद रद्द केली आणि राज्याचे जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. त्या अतिशय संवेदनशील आणि ऐतिहासिक घडामोडींच्या काळात मलिक यांनी राज्यपाल म्हणून प्रशासन हाताळले.
त्यानंतर त्यांची नेमणूक गोव्याचे 18वे राज्यपाल म्हणून 3 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. यानंतर त्यांनी मेघालयचे राज्यपाल म्हणून ऑक्टोबर 2022 पर्यंत कार्य केले. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी आणि संस्थांनी दुःख व्यक्त केले असून, भारतीय सार्वजनिक जीवनातील एक स्पष्टवक्ते, निर्भीड आणि अनुभवसंपन्न नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.