Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

उद्धव ठाकरे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कोकणात ‘हा’ बडा नेता हाती बांधणार शिवबंधन!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्यभरात दौरे करीत आहेत.

निसार शेख, रत्नागिरी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्यभरात दौरे करीत आहेत. आता उद्धव ठाकरे हे शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. येत्या 5 मार्चला उद्धव ठाकरे रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. या सभेला विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत. याच सभेत माजी आमदार संजय कदम हाती शिवबंधन बांधणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जात आहेत. शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. मुंबई शहर,पश्चिम आणि पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांना बदलण्यात आले आहे. आता शिंदे गटाच्या आव्हानानंतर मुंबईतील विभागप्रमुख बदलून त्याजागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हे पाहता संघटनेला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जात आहेत.

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पक्षाला मजबूत करण्यासाठी जातीने लक्ष घालत आहेत. रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. या दोघांनाही टक्कर देण्यासाठी कोकणातून उद्धव ठाकरे आपला शिलेदार मैदानात उतरविणार आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजय कदम हे पून्हा घरवापसी करून ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार आहेत.

संजय कदम यांच्या प्रवेशाने दापोली – मंडणगड मतदारसंघात शिवसेना मजबूत होण्यास मदत होईल, अशी ठाकरे गटाची व्युहरचना आहे.शिवसेनेत फूट पडल्यानंतर रत्नागिरीतून उदय सामंत आणि खेडमधील योगेश कदम (दापोली-मंडणगड मतदारसंघ) हे विद्यमान आमदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे खेचण्यासाठी ठाकरेंनी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात केली आहे. कोकणातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावरही पक्षनेतृत्व मोठी जबाबदारी सोपविणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com