वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय राठोड, यवतमाळ

वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड गावानजीक येथील पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर प्राण्यांचे जीवाष्म सापडले आहे.दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. प्रा. चोपणे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून छंद आणि अभ्यास म्हणून सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पांढरकवडा,राळेगाव,झरी तालुक्यात 6 कोटी वर्षाच्या शंख-शिपल्याची जिवाष्मे तर 150 कोटी वर्षं पूर्वीची स्ट्रोमॅटोलाईटची जिवाष्मे शोधून काढली आहेत.

त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 25 हजार वर्ष पूर्वीची पाषाणयुगीण अवजारे सुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी प्रदर्शित करून ठेवली आहेत. वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक या 150 कोटी वर्षे दरम्यानच्या काळातील पैनगंगा गृपचा चुनखडक असून त्या काळात इथे समुद्र होता.जुरासिक काळात इथे विशालकाय अशा डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला.परंतु 6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले. इथे बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही ते पाहायला मिळतात. परंतु अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत. विरकुंड गावाजवळ 50 वर्षांपूर्वी डायनोसॉरचा अष्मीभूत सांगाडा असावा. परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे आणि पहार बांधण्यासाठी वापरला,हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनोसॉरची हाडे सुद्धा घरे बांधन्यासाठी वापरली.

त्यामुळे येथे पुन्हा जिवाष्मे आढळली नाही. 40 वर्षापूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे यांना एक जिवाष्मीकृत हाड सापडले. जीवाश्मांच्या आकार,प्रकार, स्थळावरून ,काळावरून आणि भूशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या मतानुसार हे जीवाष्म डायनोसॉर चेच आहे असा विश्वास प्रा. चोपणे यांनी व्यक्त केला. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खुप जिवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत. चंद्रपुरप्रमाणे वणी,मारेगाव,पांढरकवडा,झरी,मुकुटबन हा परिसर जिवाश्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृध्द आहे. या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनोसॉरची जिवाष्मे आढळू शकतात. त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्वे आणि संशोधन होणे गरजेचे आहे असे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com