Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न
पुण्यातील जगप्रसिद्ध गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 32 तासांपेक्षा अधिक काळ सुरू राहिली. शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाच्या गणपतींच्या आरतीने मिरवणुकीला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे मानाच्या पाचही गणपती मंडळांनी यंदा दिलेल्या वेळेतच विसर्जन पूर्ण केलं, जे दरवर्षीपेक्षा लवकर होतं. तरीदेखील शहरातील उर्वरित हजारो मंडळांच्या मिरवणुका रेंगाळल्याने अखेर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संपूर्ण विसर्जन मिरवणूक संपली.
यंदा पुण्यात सुमारे 3800 सार्वजनिक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने नेहमीप्रमाणे मध्यरात्रीऐवजी दुपारीच मिरवणुकीत सहभागी होत अवघ्या काही तासांत विसर्जन पूर्ण केले. तरीदेखील रात्रीच्या वेळेस इतर मंडळांच्या मिरवणुका मंद गतीने पुढे सरकल्यामुळे अखेर संपूर्ण विसर्जन 32 तासांहून अधिक वेळ चाललं.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा लागलेला वेळ अधिक ठरला आहे. 2016 ते 2019 दरम्यान मिरवणुकीला 24 ते 28 तास लागले होते, तर 2022 मध्ये 31 तास आणि 2024 मध्ये 30 तासांत मिरवणुकीचा समारोप झाला होता. मात्र 2025 मध्ये हा कालावधी वाढून विक्रमी 32 तासांपेक्षा अधिक झाला. यामुळे विसर्जन मिरवणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही ठिकाणी ढोल-ताशा पथकांकडून भाविक आणि पत्रकारांवर गैरवर्तन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, संपूर्ण सोहळा पोलीस बंदोबस्ताखाली शांततेत पार पडला असून, सर्व मंडळांनी प्रशासनाला सहकार्य केले. यंदा मेट्रोमुळे कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट परिसरात मोठी गर्दी झाली होती, तरीही सुरक्षित वातावरणात पुण्याचा गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक यशस्वीरित्या पूर्ण झाली.